चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती। वघ्रहि न खाती सर्प तया ।।1।।
विष अमृत आघात ते हित।अकर्तव्य नीत होय त्यासी ।।2।।
दु:ख ते देईल सर्व सुख फळ।होतील शीतळ अग्निज्वाळा।3।।
आवडेल जीवा जीवाचिये परी।सकळां अंतरी एक भाव।।4।।
तुका म्हणे कृपा केली नारायणें।जाणिजे ते येणे अनुभवे।।5।।
मनाची निर्मळता म्हणजे तरी काय........
तुकाराम महाराजांनी या अभंगात अंत:करणात असलेली सद्भावना आणि सर्वाप्रति सदिच्छा असेल तर मिळणार्या मन:शांतीचे महत्त्व सांगितले आहे. मन द्वेषरहित व शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात. एवढेच नव्हे तर वाघ, साप इ. भयप्रद मानले जाणारे प्राणीसुद्धा स्पर्श करीत नाहीत. अंत:करणातील निर्मळतेमुळे विषारी भावसुद्धा अमृमय होतात. मनाची निर्मळता म्हणजे तरी काय? मानवी मनाच्या विविध अवस्था याच भावनांची उपपत्ती करतात. तुकारामांनी या अभंगात एका सुसूत्र, तार्किक व मनोविश्लेषणात्मक अशा विचारांची सुरेख मांडणी केली आहे. दुजाभाव, द्वेष, मत्सर, अमंगाल्य विचारांपासून मनाला दूर ठेवणे. निर्मळ मन म्हणजे खळखळणारा झरा, मंद वेगाने वाहणारा वारा, चंद्राचा शीतल प्रकाश उगवत र्सूकिरणांचा उबदारपणा, अशा तर्हेची अनुभूती होय. म्हणजे मन शुद्ध, पवित्र द्वेषविरहित ठेवले की त्याचे उपद्रवमूल्य कमी तर होतेच ते इतरांसाठी, पण स्वत:च्याही मनातील अस्वस्थता, अकारण चिंता भाव दूर होतात.
जीवनातील आघातांचे दु:ख जाणवेनासे होते ते मनाच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे, हेच तुकोबांना सुचवाचे होते. यानिमित्ताने आपले माजी राष्ट्रपती व विश्वविख्यात शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वृत्ती व कार्यप्रवणता यातून मनातील इच्छा मूर्त स्वरूपामध्ये कशा आणता येऊ शकतात, याचे एक महत्त्वाचे सूत्र त्यांच्या वर्तनात आढळते. हृदयापासून, मनापासून एखादी इच्छा जर निर्माण झाली आणि ती जर तीव्र आणि पवित्र असेल आणि जर तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. ज्यावेळेस आपण निद्रिस्त अवस्थेत असतो, त्यावेळेस ती आसमांतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये परतते. अशाप्रकारे जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवते.

No comments:
Post a Comment